रेल्वेच्या चेंबरमध्ये कोसळलेल्या बैलाला जीवदान; तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर यशस्वी सुटका

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): शिवाजीनगर येथील रेल्वे परिसरात उघड्या असलेल्या एका मोठ्या चेंबरमध्ये बैल पडल्याची घटना समोर आली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि 'मॅन विथ इंडिज' संस्थेच्या वन्यजीव बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर या बैलाची सुखरूप सुटका केली. रेल्वे प्रशासनाच्या उघड्या चेंबरमुळे मुक्या जनावराचा जीव धोक्यात आल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत असतानाच, बचाव पथकाच्या
या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.
चेंबर अरुंद व खोल असल्याने बैलाला स्वतःहून हालचाल करणे अशक्य होते. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान व वन्यजीव बचाव दलाचे प्रमुख आशिष जोशी टीमसह घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य आव्हानात्मक होते.
चेंबरची खोली, कमी जागा असताना टीमने हार्नेस आणि विशेष उपकरणांचा वापर करून बैलाला सुरक्षितपणे वर काढले. बैलाला गंभीर दुखापत होऊ नये याची विशेष काळजी घेण्यात आली.
यावेळी हर्ष केवरे यांनी सांगितले की, आमचे पथक सदैव तत्पर असून, शहर व परिसरात वन्यजीव तसेच भटक्या प्राण्यांच्या बचावासाठी सातत्याने कार्यरत आहे. अग्निशमन दलाच्या सहकार्यामुळेच हे बचावकार्य यशस्वी झाले. या घटनेमुळे उघडी चेंबर्स व धोकादायक जागा तत्काळ झाकण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. 'मॅन विथ इंडिज' ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून वन्यजीव आणि प्राण्यांच्या संरक्षणासाठी उल्लेखनीय कार्य करत आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions